शिवसेनेलाही हवे जिल्हा परिषद अध्यक्षपद

0
79
0ZPkolhapur

कोल्हापूर : शिवसेनेला वगळून जिल्हा परिषदेमध्ये कोणाचीही सत्ता येऊ शकत नसल्याचे जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेमध्ये शिवसेनेला चांगलेच महत्व आले आहे. त्याचा फायदा घेऊन यावेळी शिवसेना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर दावा सांगणार असल्याचे समजते. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ता संघर्ष अधिक तीव्र – होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान , शिवसेनेच्या भूमिकेवर भाजप लक्ष ठेऊन आहे. शिवसेनेचा भूमिका झाल्यानंतरच भाजप आपली व्यूहरचना आखणार आहे. 

२०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप प्रथमच ताकदीने उतरला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज झालेल्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्याना भाजपमध्ये घेतले गेले. भाजप मध्ये घेत असताना काही जणांना पदाचा शब्द दिला, तर काही जणांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली. त्यामुळेच अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, यांच्यासारखे काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्षानुवर्षे काम करणारे कार्यकर्ते त्यांच्या हाती लागल्याने जिल्हा परिषद मध्ये सर्वात अधिक १४ सदस्य त्याचे निवडून आले आणि जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भाजपने सत्ता स्थापन केली. यासाठी भाजपला महाडिक गटाची खूपच मदत झाली.

सत्ता स्थापन करत असताना भाजपला शिवसेना व जनसुराज्य शक्ती पक्ष  मोलाची साथ लाभली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने केवळ अध्यक्ष पद आपल्याकडे ठेवले आणि शिवसेना व जनसुराज्य शक्ती पक्ष याना प्रत्येकी दोन पदे दिली. इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे अध्यक्षांसह सगळे पदाधिकारी सव्वा वर्षांनी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला:मात्र काठावरचे बहुमत असल्यामुळे पदाधिकारी बदल अखेरपर्यंत न झाल्याने सदस्यांमधून सध्या नाराजी आहे. 

सध्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्हा परिषदेत शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय कोणालाही सत्ता स्थापित करता येणार नाही. त्यामुळे शिवसेनाच शिवसेना अध्यक्ष पद मागण्याच्या भूमिकेत आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे सदस्य एकत्र बसण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेतील शिवसेना सदस्याचा एक नेता नाही. त्यामुळे शिवसेनेसोबत चर्चा करावयाची झाल्यास कोणासोबत करायची, असा प्रश्न आघडीतील नेत्यांना पडला आहे. कारण,शिवसेनेचे दहा सदस्य आहेत, त्यातील काही सदस्य माजी आमदार  सत्यजित पाटील- सरुडकर याना तर काही माजी आ. डॉ.सुजित मिणचेकर , काही माजी आ. चंद्रदीप नरके, याना मानणारे आहेत. तर काही सदस्य खासदार संजय मंडलिक याना मानणारे आहेत, आणि काही प्रकाश आंबिटकर या गटातील आहेत. शिवसेनेची अशी स्थिती असल्यामुळे शिवसेना सदस्य एकत्र राहून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद पदरात पडून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. शिवसेना अध्यक्षपद देणाऱ्याला आघाडीसोबत शिवसेना राहील, असे म्हणणे शिवसेनेच्या काही सदस्यांचे आहे. सुरुवातीला भाजपने अध्यक्ष पद भूषविले आहे. आता भाजपने शिवसेनेला अध्यक्ष पद द्यावे, असे शिवसेनेच्या काही सदस्यांचे मत आहे. याचमुळे जिल्हा परिषद सत्ता संघर्षाला अधिक धार येणाची शक्यता आहे.