पुरग्रस्तांची कर्ज माफ करा

0
98

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात पुरामुळे अपरिमित हानी झाली आहे त्यामुळे संपूर्ण तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी तसेच पुरग्रस्तांची कर्जे माफ करावीत यासारख्या मागण्या शिरोळ तालुका पृग्रस्त समिती तर्फे करण्यात आल्या. या मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. बिंदू चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, असेम्ब्ली रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा दाखल झाला यामध्ये मालिकांचा लक्षणीय सहभाग होता. विविध मागण्याचे फलक महिलांनी हातात घेतले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा येताच फायनान्स  कंपन्यांनी दिलेल्या नोटीस जाळण्यात आल्या. 

निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे याना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. याबाबत निवेदनात म्हटले आहे, विविध कंपन्या , बँका, यांनी बचत गटांना दिलेली कर्जे माफ करावीत. तालुक्याची पूररेषा निश्चित करून नागरिकांचे पुनर्वसन करावे., पुरबाधित अतिक्रमित घरे, गायरान , देवस्थाने, शासकीय जागेवरील घराना अनुदान द्यावे, तसेच अनेक घराना भेगा पडल्या आहेत. त्या घराची डागडुजीसाठी अनुदान द्यावे. बँका, फायनान्स कंपनीकडून वसुलीसाठी नोटीस दिली जात आहे. यामध्ये बचत गटाच्या महिलांचा जास्त समावेश आहे. या महिला कमी आर्थिक उत्पन्न असणाऱ्या आहेत. आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असून बँका व फायनान्स कंपन्या यांनी कर्जे वसुली साठी  तगादा लावला आहे. त्यांच्यावर कारवाई करावी. येथील नागरिकांसाठी रोजगाराची उपलब्धता शासनाने निर्माण करून द्यावी. यावर्षीची घरफाळा व पाणीपट्टी शासनाने माफ करावी. पुरामुळे तालुक्यात आरोग्याचा प्रश्न मोठा निर्माण झाला आहे. त्यामुळे वृद्ध , अपंग, याना २ ते ३ हजार रुपये पेन्शन द्यावी. तसेच तालुक्यातील नागरिकांनी शिक्षणासाठी घेतलेले शैक्षणिक कर्ज माफ करावे. 

  यावेळी दिगंबर सकट , सविता राजपूत, कल्पना कोळी, आफरीन तहसीलदार, इस्सार इनामदार , आयुबखान वाळवेकर आदींची उपस्थिती होती.