गोकुळमध्ये सत्ताधारी गटात फूट..! ; डोंगळे, पाटील, चुयेकर यांची वेगळी चूल

0
112

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळच्या निवडणुकीला काही दिवस शिल्लक आहेत. मात्र आज (सोमवार) ठराव दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, शशिकांत पाटील – चुयेकर यांनी सहाय्यक निबंधक गजेंद्र देशमुख यांच्याकडे आपला स्वतंत्र ठराव दाखल केला आहे. आम्हाला सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत या तिघांनी स्वतंत्र ठराव दाखल केला आहे. त्यामुळे गोकुळच्या सत्ताधारी गटात फुट पडली आहे.

यापैकी डोंगळे गटाचे २०४, विश्वास पाटील गटाचे २९३, चुयेकर यांना मानणारे जिल्ह्यातील सर्व ठरावधारक आमच्याबरोबर असतील असा दावा शशिकांत पाटील – चुयेकर यांनी यावेळी केला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच निवडणुकीत सर्व पर्याय खुले आहेत असेही ते म्हणाले. गोकुळमध्ये या तीन गटाची ताकत मोठी असल्याने सत्तधारी गटाला अडचणींना सामोरे जावे लागणार असे दिसून येत आहे.

गोकुळच्या या बड्या नेत्यांनी सहाय्यक निबंधकांकडे आज सकाळी साडे दहाच्या दरम्यान स्वतंत्र ठराव दाखल केला आहेत. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांना गोकुळच्या निवडणुकीपर्यंत चेअरमन पदावर ठेवायला हवं होत असा दावा पाटील यांनी नेत्यांकडे केला होता. मात्र नेत्यांनी ते डावलून रवींद्र आपटे यांना अध्यक्षपद दिले. त्यामुळे विश्वास पाटील चांगलेच दुखावले गेले होते. या नाराजीचे रुपांतर सत्ताधारी गटापासून दूर जाण्याचा निर्णय पाटील यांनी घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र अरुण डोंगळे यांचे कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मागील चार दिवसापर्यंत आपण सत्ताधाऱ्यांसोबत आहोत असं छातीठोकपणे सांगणारे आज मात्र त्यांनी देखील स्वतंत्र ठराव दाखल केल्याने त्यांचा काय विचार आहे हे स्पष्ट झालेले नाही. कदाचित या नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असल्यास विरोधक गटाला बळ मिळणार आहे. याआधी अरुण डोंगळेसह सहा संचालकांनी सत्ताधारीसोबत राहून बंड पुकारलं होतं.

आज घेतलेल्या या निर्णयामुळे गोकुळचा राजकारणात सत्ताधाऱ्यांमध्ये मोठे चिंतेचे कारण निर्माण झाले आहे. मात्र इतर संचालक काय निर्णय घेतील हे पुढे स्पष्ट होईल. यामुळे गोकुळच्या निवडणुकीत चांगलाच रंग भरणार असे दिसून येत आहे.

यावेळी जि. प. सदस्य सुहास सातपुते, तुकाराम पाटील, धीरज डोंगळे, माजी पंचायत समिती सदस्य सुनिल पाटील, सचिन पाटील, राहुल पाटील, अनिल सोलापूर आदी उपस्थित होते.