जेएनयूमध्ये विद्यार्थी व शिक्षकांना मारहाण

0
143

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील संकुलात आज सायंकाळी जेएनयूएसयू आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष आणि अन्य अनेक विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना अभाविपच्या सदस्यांनी मारल्याचा दावा जेएनयूएसयूने केला आहे. यात एक शिक्षकही गंभीर जखमी झाले आहेत. माझ्यावर अत्यंत क्रूर पद्धतीने गुंडांनी हल्ला केला, माझ्या नाकातोंडातून रक्त येत आहे. मी बोलण्याच्या देखील स्थितीत नाही असं जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष म्हणाली आहे.

डाव्या संघटनांचे कार्यकर्ते व जेएनयूचे शिक्षक शुल्क वाढीच्या मुद्यावरून आंदोलन करत असताना, ही हाणामारीची घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. चेहरे झाकलेले अज्ञात हल्लेखोर आले आणि त्यांनी लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. शिक्षकांवरही हल्ला करण्यात आला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तोडफोडही करण्यात आली. गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. या घटनेचे प्रत्यक्षदर्शींनी काढलेले काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यात विद्यार्थी हातात काठ्या घेऊन आलेले दिसत आहेत.

जेएनयूमधील हिंसाचाराची माहिती ऐकून मला धक्का बसला. विद्यार्थ्यांवर क्रुरपणे हल्ला केला गेला आहे. पोलिसांना तातडीने ही हिंसा थांबावी व शांतता प्रस्थापित करावी. जर विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थी सुरक्षित नसतील, तर देशाचा विकास कसा होईल? , असं मुख्यमंत्री केजरीवील यांनी या घटनेबद्दल ट्विट केलं आहे.

अभाविपचा दावा आहे की त्यांचा अध्यक्षपदाचा उमेदवार मनीष जांगीड या मारहाणीत जखमी झाला आहे. कदाचित त्याचा हातही फ्रॅक्चर झाला आहे. विद्यार्थ्यांनी दगडफेक केल्याचा आरोप दुर्गेश याने केला आहे.