राज्यात आणखी १२ जण कोरोना बाधित, रुग्णांचा आकडा ६४

0
71

कोरोनाचे राज्यात आज एकूण १२ नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ६४ झाली आहे. त्यामध्ये ८ रुग्ण मुंबई येथील तर २ जण पुणे येथील आहेत. प्रत्येकी १ रुग्ण यवतमाळ आणि कल्याण येथील आहे. दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चने (आयसीएमआर) प्रयोगशाळा चाचणीचे निकष बदलले असून संसर्गाच्या सामाजिक प्रसाराची चाचपणी सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (ता.२१) बोलताना सांगितले.

मुंबईत आढळलेल्या ८ रुग्णांपैकी ६ जणांचा परदेश प्रवासाचा इतिहास आहे तर एक जण विमानतळावर काम करणारा कर्मचारी असून आणखी एक रुग्ण गुजरातमध्ये प्रवास केलेला आहे. यवतमाळ येथील असणारा पण मुंबईत भरती असलेल्या रुग्णाने कांगो देशाचा प्रवास केलेला आहे. कल्याण येथील कोरोना बाधित रुग्ण हा दोन दिवसांपूर्वी बाधित आढळलेल्या आणि दुबई प्रवास केला आहे. उल्हासनगर येथील तरुणीचा भाऊ आहे.

तो स्वतः ही बहिणीसोबत दुबईला गेला होता. पुणे येथील २५ वर्षाच्या बाधित तरुणाने इंग्लंड आणि आयर्लंड येथे प्रवास केलेला आहे. दरम्यान, कुठलाही परदेश प्रवासाचा इतिहास नसलेली एक ४१ वर्षाची पुण्यातील महिला करोना बाधित आढळलेली आहे. हा रुग्ण बाधित येण्यामागील कारणमीमांसा तिच्या साथरोगशास्त्रीय अन्वेषणानंतर स्पष्ट होईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.