‘कोरोना’चा धसका : गडहिंग्लजच्या प्रांताधिकाऱ्यांनी कृतीतून सांगितला उपाय

0
104

‘कोरोना’च्या मुकाबल्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनला दहा दिवस उलटले असून अजूनही १४ दिवस बाकी आहेत. दरम्यान, सर्व शहरे आणि खेड्यातील केशकर्तनालये, सलून व ब्युटी पार्लरदेखील लॉकडाऊनमुळे बंद आहेत. त्यामुळे केस कुठे कापायचे, दाढी कुठे करायची ? अशी कुजबुज सर्वत्र सुरू आहे. परंतु, येथील कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी आपल्या कृतीतून घरच्या घरी सर्वांना सहज करता येईल, असा सोपा उपाय सांगितला आहे.२२ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जनता कर्फ्यू लावला. त्यापाठोपाठ त्यांनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. अगदी दूध, किराणा माल, भाजीपाला आणि फळेदेखील ठराविक दिवशी आणि ठराविक वेळेतच उपलब्ध होत आहेत.दरम्यान, लॉकडाऊनमुळे गडहिंग्लज शहर आणि तालुक्यातील सलून आणि ब्युटी पालर्सदेखील बंद आहेत. त्यामुळे दररोज दाढी करण्याची सवय असणाऱ्यांची मोठी कुचंबणा झाली आहे. तशीच अवस्था नियमितपणे पार्लरला जाणाऱ्या महिला भगिनींची झाली आहे. त्यामुळे कांही मर्यादित वेळेत सलून आणि पालर्स सुरू करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळावे, असा मेसेज सरपंच संघटनेचे सचिव शिवाजी राऊत यांनी गडहिंग्लज तालुका सरपंच संघटनेच्या गु्रपवर टाकला.तथापि, सद्य:परिस्थितीत अशा प्रकारच्या सेवांना परवानगी देता येणार नाही. परंतु, आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे केस आपण घरीच कापू शकतो. मी स्वत: माझ्या वडीलांचे केस घरीच कापले आहेत. तुम्हीदेखील तसे करू शकता, असे कृतीशील उत्तर प्रांताधिकारी पांगारकर यांनी छायाचित्रासह अवघ्या दोनच मिनीटात त्या ग्रुपवर दिले. त्यामुळे महापूराच्या संकटात सापडलेल्या नागरिकांची काळजी समर्थपणे वाहिल्यानंतर कोरोनापासून जनतेचा बचाव करण्यासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या प्रांताधिकाऱ्यांच्या पितृसेवेला तमाम सरपंचांनी सलाम ठोकला. केशकर्तनालयात सोशल डिस्टंन्सचा नियम पाळणे अशक्य आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणि फैलाव टाळण्यासाठी सर्वांनी घरातच केस कापावेत. मीदेखील मुलग्याकडूनच केस कापून घेतले आहेत. संवेदनशील प्रांताधिकाऱ्यांचा कृतीशील संदेश सर्वांनी आचरणात आणावा आणि स्वत:ची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी.- उदयसिंह चव्हाण,अध्यक्ष गडहिंग्लज तालुका सरपंच संघटना.